तो


तॊ नेहेमीच जायचा दिशांची चौकट ओलांडून
द्यायचा तिथल्यांना अज्ञात काहीतरी, आणि ते हिरवळून जायचे.

तो बुडवून टाकायचा सुर्याची क्षितीजावरली किरणं
आणि मग शब्दांना घेवून फिरायचा, गुंफायचा ओळींचा गजरा संधीकालात.

तो बांधायचा मृगजळाचे घर, सजवायचा संध्याकाळच्या कवितांनी
आणि मग बसायचा तिथेच, पण आपल्यासाठी तो तिथे नसायचाच.

त्या घरा समोरील सूर्यबिंब आता विझतच नाही.
दिशापल्याडची माणसं करपलीयेत-तरसलीयेत त्याच्यासाठी.
त्याच्या शब्दांचा संधीकाली गजरा आता विखरून पडलाय.

कुणास ठाऊक कुठल्या अज्ञाताच्या प्रवासात ज्ञात शोधत फिरतोय तो ह्या सगळ्यांना मागे सोडून.
तो तेव्हाही आपला नव्हताच... आणि आता तो फक्त त्याचाच, त्याच्यासाठी...

-
कवि ग्रेस 

प्रत्येक भाषेत काही कविता, कथा अशा असतात कि फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच ती भाषा एखाद्याने शिकावी. त्या काही ठराविक साहित्यापैकी असलेली हि एक कविता.

गेल्या काही वर्षांत मराठीकडे साहित्यिक दृष्टीकोनातून बघायला विसरूनच गेलो होतो, पण कधी कधी  अचानकपणे एखाद्या मराठी वेबसाईट वर Mozilla घुटमळतो आणि मग नकळत उमगत कि आपल्या प्रत्येक विचारामध्ये, श्वासा-श्वासामध्ये पहिली-दुसरीत शिकलेली बाराखडीच आहे.

No comments:

Post a Comment